नागरिकांनी दोन डोस घेणे आवश्यक; तहसीलदार कनशेट्टी यांचे आवाहन

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत तहसीलदार ए.एम.कनशेट्टी यांनी व्यक्त केले. शहरातील मंगल कार्यालय येथे बाजारपेठेतील सर्व व्यापार्‍यांच्या घेतलेल्या मीटिंगमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडके, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, नगरसेवक चंद्रकांत रोडे यांसह बाजारपेठेतील सर्व व्यापारी उपस्थित होते. यावेळी व्यापार्‍यांना माहिती देताना तहसीलदार यांनी सांगितले की, सध्या राज्यात ओमायक्रोनचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात दोन दिवसात वाढलेली संख्या चिंता वाढवणारी असल्याने आपण काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजारपेठेतील सर्व आस्थापना ज्यामध्ये किराणा विक्रेते, भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते, फळ विक्रेते, लहान मोठे हॉटेल व्यावसायिक, रिक्षा, मिनिडोअर चालक मालक आदी सर्व व्यावसायिकांनी दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच दुकानाबाहेर मास्क नाही प्रवेश नाही अशा आशयाचा बोर्ड लावावा, पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन ए.एम.कनशेट्टी यांनी उपस्थित व्यापार्‍यांना केले.

Exit mobile version