| पेण | वार्ताहार |
पेण बाजार पेठेतील मिर्चीगल्ली ही शिवकालापासून मिर्चीसाठी प्रसिध्दच आहे. संत तुकारामांनी देखील पेण शहरात मिर्ची विकल्याचे दाखले आजही इतिहासात मिळतात. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मिर्ची खरेदीसाठी पावसाळयाचे चार महिने सोडले तर मोठया प्रमाणात ये-जा करतात. मात्र, गेली दोन वर्ष पेण येथील काही व्यापारी मिर्चीगल्लीत सरेआम रस्त्यावर मिर्चीचे पोती उतरवतात आणि देवाणघेवाणीचा व्यापार करतात. त्यामुळे या रस्त्याने बाजार हाट करणार्या सर्वसामान्य पेणकरांना या मिर्चीचा मोठया प्रमाणात त्रास होत असून मिर्ची गल्लीतून बाजार हाट करणार्या नागरिकांना कठीण होउन बसले आहे. व्यापारांना सर्वसामान्य पेणकर बोलायला गेले तर मिर्चीगल्लीतील काही व्यापारी तक्रार करणार्यांच्या अंगावर धावून जातात आणि दम देतात, काय करायच आहे ते करा. नगरपालिकेत तक्रार करायची असेल तर करा आम्ही घाबरत नाहीत. याचाच अर्थ या व्यापार्यांना नगरपालिका प्रशासनाची भिती उरली नाही असेच म्हणावे लागेल. जी राजरोजपणे मिर्चीची पोती उतरवून रस्ता तर अडवतातच त्याचप्रमाणे गल्ल्याही आडवण्याचे काम करतात.
महत्त्वाची बाब म्हणजे व्यापार्यांनी आपला व्यापार जरूर करावा परंतु त्याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होउ नये एवढीच नगरिकांची माफक अपेक्षा. या बाबत पेण नगरपालिकेचे अतिक्रमण कक्षाचे प्रमुख महेश वडके यांच्याशी भ्रमन्ती ध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही या अगोदर दुकानदारांना कल्पना दिलेली आहे की, रस्त्यावर माल अगर दुकानातल्या वस्तू ठेउ नये तसे केल्यास रितसर कारवाई केली जाईल. त्यामुळे मी त्वरीतच कर्मचारी पाठवून मिर्ची विक्रेत्यांना आपला माल दुकानात घेण्यास सांगतो.
व्यापार्यांच्या मिर्चीमुळे पेणकरांना ठसका
