नेत्रचिकित्सकांची जागा आठवड्यापासून रिक्त
| पेण | प्रतिनिधी |
सध्या पेणसह रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ सुरू आहे. लहान-मोठे सर्वांमध्ये ही साथ पसरली आहे. दरम्यान, पेण उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. प्रभाकर सोनावणे यांची आठ दिवसांपूर्वीच खालपूर येथे बदली झाल्याने याठिकाणी नेत्र चिकित्सकच नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे भरून खासगी रुग्णालयात जावे लागत असून, नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे.
दरम्यान, ज्यांना खासगी दवाखान्याचे बिल परवडत नाहीत ते घरगुती उपायांवर समाधान मानत आहेत. परंतु, त्यामुळे अनेक वेळा डोळ्याला गंभीर इजा होऊन डोळे निकामी पडण्याची शक्यता असते. एकंदरीतच, पेण उपरुग्णालयात नेत्रचिकित्सक नसल्यामुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, डॉ. प्रभाकर सोनावणे यांची आतापर्यंत पेण येथील सेवा उत्तम होती. कोरोना काळात तर त्यांनी पेणकरांना मोलाचे सहकार्य केले हेाते. जर डॉ. प्रभाकर सोनावणेंच्या जागेवर दुसऱ्या डॉक्टरची उपलब्धता होत नव्हती, तर त्यांची बदली कशी झाली अथवा वैद्यकीय अधीक्षक पेण यांनी मोठा प्रमाणात डोळे येण्याची साथ असतानादेखील डॉ. सोनावणे यांना पेण येथून खालापूरला जाऊ कसे दिले, याबाबत सर्वसामान्यांत चर्चेचे काहूर माजले आहे.