| पोलादपूर | प्रतिनधी |
गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर शहरातील पाच पुलांच्या बांधकामानंतर पूर्व आणि पश्चिमेच्या सर्व्हिस रोडवरील दोन्ही लेनला ओलांडून ये-जा करण्यासाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी सुरु होती. आता पादचारी पूल बांधून झाल्यानंतर या पुलावर जाण्यासाठी पादचाऱ्यांना जिना चढून जावे लागणार असून, दोन्ही सर्व्हिस रोडवर चक्क स्पायरल लॅडर्स जोडण्यात येत आहेत. मात्र, या स्पायरल लॅडर्सचा उभा जिना चढायला लागणार असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे काम थांबविण्यासाठी पोलादपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, तात्पूरते हे काम थांबविण्यात आले आहे.
पोलादपूर शहराला पुर्व व पश्चिम भागांना जोडण्यासाठी पाच पादचारी पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानंतर सहाव्या पादचारी पुलाच्या मागणीने गेल्या काही वर्षांपासून जोर धरला होता. रास्ता रोको आणि पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच या सहाव्या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी गर्डर टाकण्यात आले आणि काम थांबले. त्यानंतर अचानक चार दिवसांपूर्वी पुलाच्या पूर्व आणि पश्चिम सर्व्हिस रोडवरील पादचाऱ्यांना पुलावर जाण्यासाठी स्पायरल लॅडर्सचा जिना उभा करण्यात आला. परंतु, या जिन्याची रचना पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. या पुलावर जाण्यासाठी उभारलेल्या जिना अत्यंत अरुंद आणि धोकादायक स्वरूपाचा असून, या जिन्यावरून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे चढता येणार नसल्याने नागरिकांनी या कामाला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सारिका विचारे यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांना लेखी निवेदन देऊन स्पायरल लॅडर्सचे काम थांबविण्यासंदर्भात आवाहन केले. परिणामी, दिवसभर युद्धपातळीवर सुरू असलेले स्पायरल लॅडर्सचा जिना उभारण्याचे काम थांबविण्यात आले.
स्पायरल लॅडर्सला नागरिकांचा विरोध
