ओव्हरफ्लो पाण्याच्या टाकीमुळे नागरीक त्रस्त

। पेण । वार्ताहर ।
पेण येथील डोंगरी वरची पाण्याची टाकी सतत दहा दिवस ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे पेणमधील गोविंद बाग येथील 4 लाख लिटरची पाण्याची टाकी पत्यांच्या इमारती प्रमाणे जमिनदोस्त झाली, तशीच या टाकीची गत होऊ नये अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे. शुक्रवारी रात्री पुर्ण टाकी ओव्हरफ्लो होऊन आजुबाजुच्या घरांना पाण्याचा त्रास झाला. डोंगरी वरचे रहिवासी असलेले भूषण कडू यांनी तेथे असणार्‍या जल शुद्धिकरण केंद्रावरील कर्मचार्‍यांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्या जलशुद्धी केंद्रावर कर्मचारीच हजर नव्हते. गेली आठ दहा दिवस सतत ही टाकी ओव्हरफ्लो होत आहे. स्थानिकांनी वारंवार पेण नगरपालिकेत लेखी निवेदन, तोंडी तक्रार केली आहे, परंतु त्यावर उपाययोजना होतच नाही. गेल्या आठवड्यात अपघात होऊन सुध्दा नगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत, ही मोठी चिंतेची बाब आहे. एकीकडे खारेपाटात पाण्यासाठी लोक वणवण करत आहेत. तर दुसरीकडे पेण नगरपालिका आतोनात पाण्याचे नुकसान करताना पहायला मिळत आहे. लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लोच्या मार्गाने वाया तर जात आहे. तरी तेथील रहिवाशांचा अंत न पाहता नगरपालिका प्रशासनाने या टाकीबाबत योग्य ती पाऊल उचलावीत अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

Exit mobile version