| नवीन पनवेल । वार्ताहर ।
तळोजा, खारघर परिसरात बुधवारी रात्री पसरलेल्या रसायनांच्या उग्र वासामुळे अनेकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली. त्यामुळे प्रदूषण महामंडळाने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
खारघर आणि तळोजातील नागरिक वारंवार होणार्या प्रदूषणामुळे मेटाकुटीला आले आहेत. अशातच विजयादशमीचा उत्साह संचारला असतानाच बुधवारी रात्री एकनंतर पुन्हा तळोजातील रासायनिक औद्योगिक क्षेत्रातून हवेत रसायने सोडण्यात आल्याने अनेकांवर रात्रभर जागरण करण्याची वेळ आली. तसेच गुरुवारी पहाटेही हा त्रास होत असल्याने प्रदूषण करणार्या कंपन्यांविरोधात संतापाची भावना नागरिकांमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, रसायने सोडणार्या कंपन्यांवर प्रदूषण महामंडळाकडून नोटीस बजावण्यात येत आहे. पण या कारवाईलादेखील या कंपन्या जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
उद्योगमंत्र्यांचे आश्वासन हवेत
तळोजा एमआयडीसीमधून सोडण्यात येणार्या प्रदूषणामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होत आहे. याबाबत उद्योग विभागाकडून उपाययोजना करण्यात येतील, असे महिनाभरापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांना आश्वासन दिले होते. तसेच प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र, महिना उलटून गेल्यावरही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
तळोजा, खारघर परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रदूषण करणार्या कंपन्यांवर कारवाई देखील केली जात आहे. तरीही असे प्रकार होत असतील तर त्याची पाहणी केली जाईल.
सचिन आडकर,
तळोजा विभागीय अधिकारी, प्रदूषण महामंडळ.