जेएनपीटीतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

देशभरातून जड-अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ
। उरण । वार्ताहर ।

जेएनपीटीकडे ये-जा करणार्‍या देशभरातून जड-अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रस्ते चांगले असले तरी यार्ड हे अंतर्गत भागात असल्याने छोट्या गावातूनही ही वाहतूक वाढली आहे. त्यात वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना परिसरातील नागरिकांना वारंवार करावा लागतो. पनवेल, ठाणे, बेलापूर, पामबीच या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली की जी सतर्कता वाहतूक पोलीस दाखवतात ती सतर्कता जेएनपीटीकडे छोट्या गावातून जाणार्‍या मार्गावर दाखवली जात नाही. या मार्गावरील खास करून दिघोटे परिसरात कंटेनर यार्ड व नवी मुंबई, मुंबई-पनवेल परिसरातील अनेकांची शेतघरे असल्याने कंटेनर ते हलकी वाहने सर्वाचाच वावर मोठ्या प्रमाणावर असतो. हाच अनुभव कमी-अधिक प्रमाणात जेएनपीटीकडे जाणार्‍या हमरस्त्याव्यतिरिक्त गावातून जाणार्‍या रस्त्यांवर येतो. रात्रीच्या वेळेस जर वाहतूक कोंडीत अडकले तर एक-दीड किलोमीटरसाठी किमान दीड तासही लागतो. अशा ठिकाणी औषधालाही वाहतूक पोलीस सापडत नाहीत.
अनेकदा कंटेनर वा ट्रकमधील मदतनीस खाली उतरून वाहतूक कोंडी सोडवतो. वाहतूक कोंडीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हलकी वाहने अनेकदा मार्गिका सोडून गाडी हाकतात. परिणामी काही अंतरावर अडकून वाहतूक कोंडी होते. अशा वेळी वाहतूक पोलिसांची नितांत गरज असते. आजारी व्यक्तीला रुग्णवाहिकेत न्यायचे झाले तर वाहतूक कोंडीची काळजी असते, अशी खंत दिघोडा परिसरात राहणारे किशन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version