सीसीटीव्हीमुळे नागोठणे शहर सुरक्षित – अतुल झेंडे

| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या कल्पकतेने नागोठणे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे नागोठणे शहर सुरक्षित झाले असल्याचा विश्‍वास जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी अतुल झेंडे यांच्यासमवेत पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पो.नि. तानाजी नारनवर व पो.ह. विनोद पाटील उपस्थित होते. दरम्यान, अतुल झेंडे यांनी नागोठणे परिसरातील कंपन्यांच्या अधिकारी वर्गाची बैठक घेऊन त्यांनाही आवश्यक ते मार्गदर्शन केले.

पत्रकारांशी बोलताना अतुल झेंडे पुढे म्हणाले की, नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम कोव्हिडमुळे थांबले आहे. तसेच इमारत सुसज्ज करण्यासाठी 35 ते 40 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. इमारतीसाठी लागणारा निधी नागोठणे परिसरातील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पूर्ण करण्यात येईल व येत्या पावसाळ्याच्या आगोदर नागोठणे पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत उभी राहील, असा विश्‍वासही अतुल झेंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version