। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील सुकेळी खिंडीत संततधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असून, या महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सुकेळी खिंडीत दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावरील सुकेली खिंड हे निर्जन ठिकाण असून, महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे सुकेली खिंडीतील दोन्ही बाजूचे डोंगर कापले गेले आहेत. यामुळे येथील डोंगराची माती सैल झाली आहे. यामुळे पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याचा मोठा धोका असतो. तर अतिवृष्टीच्या काळात सुकेली खिंडीत पाणी साचणे, दरड कोसळणे यामुळे अनेक तास वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक ठप्प होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. महामार्ग 66 वरील एक प्रमुख व आव्हानात्मक ठिकाण असून, या मार्गांवरून विविध प्रकारच्या वाहनाची सतत वर्दळ सुरु असते. या महामार्गाला असणारी वेडी वाकडी वळणे व चढ उतारामुळे कोणत्याही परिस्थितीचा अंदाज येत नाही अशा वेळी अचानक दरड कोसळली तर कोणाचा नाहक बळी जाऊ शकतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.







