स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा

शेकापचा जाहीर पाठिंबा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा शासनास दिला असून, 24 फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक प्रादेशिक परिमंडळाच्या समोर अर्धनग्न अवस्थेत मूक उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनास मृत्यू पावलेल्या स्थापत्य पत्नीही सहभागी होऊन सहकार्य करणार आहेत. महिला पूर्ण वस्त्रे घालून उपोषण करणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाने या आंदोलनास पाठिंबा दिला असून, शासनाकडे प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. दरम्यान, हे आंदोलन मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर येथील अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील सर्व विभागांतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सामील होणार आहे.

हे आंदोलन प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या नियुक्तीपासून वेतन निश्‍चिती करणे, कालबद्ध पदोन्नती अंतर्गत वित्त विभागाच्या आदेशानुसार वेतनश्रेणीचा लाभ देणे व आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निकालाप्रमाणे व राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र आदेश देऊनही संबंधित अधिकारी पूर्तता करीत नसल्याने निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेने हे आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. तशा सूचना प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

अलिबाग येथे 7 फेब्रुवारी रोजी संघटनेच्या झालेल्या सभेमध्ये जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पूर्ततेबाबत आढावा घेण्यात आला असून, संघटनेच्या कृती समितीचे सचिव देशमुख व रायगड जिल्ह्याचे सचिव अंकुश पाटील तसेच संघटनेचे प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. या मागण्यांबाबत एक निवेदन विधान परिषद सदस्य, आमदार जयंत पाटील यांनाही देण्यात आले आहे. आ. पाटील यांनी याबाबत सकारात्मक पाठिंबा दिला असून, शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

शेकापचा पाठिंबा
सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियांत्रिकी सहाय्यकांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना दिले. आ. पाटील यांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून, यासंदर्भात विधिमंडळात आवाज उठवून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. याबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांना आ. जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version