| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर नागरिकांना चालण्यासाठी असणाऱ्या पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले आहे. या फेरीवाल्यांमध्ये जागेच्या भांडणावरून नेहमीच वाद व हाणामारी होत असतात. अतिक्रमण करून पदपथ व रस्ते गिळंकृत करणाऱ्यांवर महापालिकेचे अतिक्रमण विभाग काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. असे प्रकार वारंवार घडत असतात आणि त्याचा त्रास पादचारी नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेने या बेकायदा पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवीन पनवेल रेल्वेस्थानकबाहेरील पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसत होते. नवीन पनवेल रेल्वेस्थानकानजीक असलेल्या तिकिट घराच्या बाहेरील पदपथावर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात एकमेकांचे सामान फेकून घेत शिवीगाळ करत असल्याचे प्रकार दुपारच्या वेळेत सुरु होता. या ठिकाणीही बसण्याच्या जागेवरून शुक्रवारी दोघांत जुंपल्याचा प्रकार घडला होता. कुरमुरेचे सर्व सामान रस्त्यावर फेकून दिले होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना येथील पदपथ रस्ते चालण्यासाठी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.