थेरोंडा बाजारपाड्यात दोन गटात हाणामारी

रेवदंडा पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी |
थेरोंडा बाजारपाडा येथे मागील रागातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. रेवदंडा पोलीस ठाणे येथे परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत वृत्त असे की, थेरोंडा बाजारपाडा येथे दि. 21 डिसेंबर रोजी साडेदहाच्या सुमारास महिला फिर्यादी यांची मुलगी घरासमोरून येत असताना, तिला कॅम्पिंगच्या व्यवसायात फिर्यादी व नातेवाईक यांनी विरोध केला असल्याने शिवीगाळ केली. याबाबत महिला फिर्यादींनी जाब विचारला असता, अर्वाच्य शब्द वापरून तिघांनी तिच्या अंगावर हात टाकून गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तसेच अंगावरील कपडे फाडून केसाना धरून जमिनीवर आपटत मनात लज्जा निर्माण केली, तसेच 14 जणांनी एकत्र येऊन फिर्यादी, त्याचा भाऊ व काकी यांना शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी केली. तसेच आरोपी क्रमांक एक यांनी फिर्यादीच्या भावाच्या धारदार वस्तूने चेहर्‍यावर वार केला. तसेच आरोपी क्रमांक दोन यांनी साक्षीदार महिलेच्या उजव्या बाजूच्या चेहर्‍यावर काठीने झोड टाकून दुखापत केली, अशी तक्रार महिला फिर्यादी यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे दिली आहे.

रेवदंडा पोलिसांनी या फिर्यादीनुसार एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा. फौजदार विजय सरके हे करत आहेत. तसेच थेरोंडा बाजारपाडा येथे दि. 21 डिसेंबर रोजी साडेदहाचे सुमारास फिर्यादी घरी असताना त्याचे सासरे यांच्या घराजवळ जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने तेथे पहाण्यासाठी गेलो असताना, पत्नी व सासू यांना आरोपी क्रमांक 1 ते 6 व आरोपी क्रमांक 15 ते 22 सर्व राहणार थेरोंडा बाजारपाडा यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी तेथे पोहोचतात आरोपी क्रमांक 2, 3, 4, 7, 8, 9 व 10 फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी फिर्यादी हे बचाव करण्यासाठी गावाच्या मुख्य रस्त्याकडे पळत आले असताना, मरीआई मंदिराजवळ आरोपी 11 ते 14 यांनी अडवून हाताबुक्क्याने मारहाण केली. यावेळी आरोपी 14 यांनी काठीने उजव्या हाताच्या कोपरावर काठीची उपट मारून दुखापत केली. यावेळी आरोपी क्रमांक 22 यांनी फिर्यादी यांच्या पत्नीचे मंगळसूत्र खेचल्याने तुटून पडून नुकसान केले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.ह. सुशांत भोईर हे करत आहेत.

Exit mobile version