। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील ऐतिहासिक वडाळे तलावातील ‘सॅल्विनिया मोलेस्टा’ या जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरूपी, शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या खरपतवार संशोधन संचालनालय, जबलपूर यांच्या संयुक्त पुढाकारातून जैविक नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा नुकताच सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत तलावात 50 हजार ‘सायटोंबॅगस साल्विनी’ या जैविक कीटकांना सोडण्यात आले आहे.
वडाळे तलावातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात यापूर्वी 20 हजार सायटोंबॅगस साल्विनी कीटक सोडण्यात आले होते. तलावातील अनुकूल वातावरणामुळे या कीटकांची नैसर्गिक वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यांची संख्या आता लाखोंच्या घरात पोहोचल्याची माहिती देण्यात आली.
हे कीटक केवळ ‘सॅल्विनिया मोलेस्टा’ या जलपर्णीवरच उपजीविका करतात. त्यामुळे तलावातील इतर वनस्पती तसेच जलचरांना त्यांच्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. दुसऱ्या टप्प्यात आणखी 50 हजार कीटक सोडण्यात आल्याने जलपर्णी नष्ट होण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
वडाळे तलावाची जैवविविधता, जलपरिसंस्था आणि नैसर्गिक पर्यावरणीय संतुलन जपण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जलपर्णीच्या समस्येवर रासायनिक उपायांऐवजी जैविक पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्याने तलावाचे नैसर्गिक पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.







