|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. शुक्रवारी (दि .20) सकाळी दहावीचे विद्यार्थी अलिबागकडे परीक्षेसाठी निघाले मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला . कुरूळ – बेलकडे रस्त्यावर असलेल्या वाहतूक कोंडीत ते अडकले.
दहावीची परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी सकाळी लवकरच घरातून निघाले.परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्यासाठी काहीजण एसटी बसने तर काहीजण खासगी वाहनाने अलिबागकडे जात होते.मात्र बेलकडे पासून कुरूळ पर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.अनेक वाहने अर्धा ते पाऊण तास एकाच जागेवर उभी राहिली आहेत. याचवेळी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. साडेनऊ वाजत आले, तरी काही विद्यार्थ्यांना अलिबाग गाठता आले नाही.
अलिबाग रोहा मार्गावरील सहान बायपास ते अलिबाग पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. सर्वच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत . त्याचा मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे.जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करून देखील त्याची दखल घेतली नाही . त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी देखील बारावीच्या विद्यार्थ्यांना याच वाहतूक कोंडीचा फटका बसला होता.
