केळकर विद्यालयात पहिली ते चौथीचे वर्ग पहिल्याच दिवशी भरले

पहिल्याच दिवशी 75 टक्के उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शासनाने इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात सोमवारपासून शाळा सुरु करण्यात आली. यावेळी पालकांनी देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने पहिल्याच दिवशी 75 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोरपणे पाळन करीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. एक दिवस आड विदयार्थीनी तर एक दिवस विद्यार्थी अशी शाळा भरविण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांना फॅमिली डॉक्टरचे तंदुरुस्ती दाखला घेऊनच प्रवेश दिला जात होता. तसेच थर्मल चेकअप, ऑक्सिजन तपासण्यात येत होता. प्रत्येक बाकावर एकाच विद्यार्थ्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे तोंड गोड करुन स्वागत केले जात होते. विद्यार्थ्यांना दप्तरासोबत मास्क आणि सॅनिटायझरची सक्ती करण्यात आली आहे. पावणे दोन वर्षांनी शाळेत उपस्थित राहणारे विद्यार्थी देखील उत्साहीत झाले होते.

Exit mobile version