। अलिबाग । प्रतिनिधी ।
गुलाबाच्या फुलांनी स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके अन् हा दिवस आणखी आनंदी करायला मिळालेला, चिमुकल्यांना नेहमीच हवंहवसं वाटणारा चॉकलेट गोड गोड खाऊ़ अशा चैतन्यमयी वातावरणात शहरातील शाळा प्रदीर्घ सुट्टयानंतर बुधवारी (दि.15) सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याच्या किलबिलाटासह शिक्षकांची चिमुरड्यांना रमविण्यासाठी सुरू असलेली धावपळ, त्यातच बराच वेळ झाल्याने आई-वडिलांकडे जाण्यासाठी बालकांची होणारी घालमेल असे सारे वातावरण बघायला मिळाले़ नव्यानेच शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना मात्र अश्रु अनावर झाले. त्यांना रडताना पाहून पालकांनाही मन घट्ट करीत शाळेतून काढता पाय घ्यावा लागला. तर काही चिमुकल्यांच्या चेहर्यावरील हास्य अनमोल होते.

शाळेचा पहिला दिवस असल्याने सकाळपासून शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी होती. लहान मुलांचे रडणे, मध्येच पटांगणात पडणे सुरु होते. आईवडिलांना सोडून शाळेत जाण्यासाठी तयार नसलेल्या विद्यार्थ्यांना चॉकटेल व आईस्क्रिम दिले जात होते. काही पालक तर शेवटच्या क्षणापर्यंत चिमुकल्यांची समजूत काढत होते. तर काही चिमुकले उड्या मारत मारत शाळेत जात होते. पहिल्याच दिवशी अलिबाग तालुक्यातील 179 प्रथमिक व माध्यमिक शाळा सुरु झाल्या तर संपूर्ण जिल्ह्यात 2621 शाळा सुरु होत्या.