| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांना शिवकालीन आणि मुघलकालिन शस्त्रांची ओळख व्हावी या उद्देशांने अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात एका अनोख्या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय दुर्मिळ शस्त्रांचा खजिना या प्रदर्शनात मांडण्यात आला होता.

मुबंई पुण्यात वस्तुसंग्रहालयातच अशी शस्त्र विद्यार्थ्यांना पहायला मिळतात. जिल्ह्यात ती सोय उपलब्ध नव्हती म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय आपल्या दारी या उपक्रमा आंतर्गत या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवकालिन आणि मुघलकालिन अशा दोन कालखंडातील शस्त्रांची या प्रदर्शनात मांडणी करण्यात आली होती. शस्त्र आणि त्यांची महत्व यावेळी विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यात आले.
तलवारी, दांडपट्टे, बिछवे, कट्यार, ढाली, भाले, खंजीर यांचे विवीध प्रकार या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तोफगोळ्यांचे दुर्मिळ प्रकार ही मुलांना यावेळी दाखविण्यात आले. काळानुरूप तलवारींचे स्वरूप, त्यांची मुठ यात करा फरक होत गेला. तलवारी बनवितांनां कोणत्या गोष्टींचा विचार केला जात होता. युध्दात कर्तबगारी सिध्द करणार्या व्यक्तीला विशिष्ट धाटणीच्या तलवारी तयार करून दिल्या जात असते. त्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. किशोर चवरकर आणि शुभम चवरकर यांनी या अनोख्या शस्त्रप्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक शिक्षक वृंदानेही या प्रदर्शनाचा अनुभव घेतला.