स्वच्छ सर्वेक्षण अभियान

श्रीवर्धन नगरपरिषद कोकणात अव्वल राज्यात पाचव्या क्रमांकावर

| श्रीवर्धन | वार्ताहर |

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात श्रीवर्धन नगरपरिषदेने कोकण विभागामध्ये पहिला क्रमांक मिळवला असून, महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. श्रीवर्धन शहरातील स्वच्छता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. श्रीवर्धन शहरातील नगर परिषदेच्या घंटागाड्या शहरातील कचरा उचलण्यासाठी सकाळच्या वेळात व सायंकाळी घरोघरी जाऊन कचरा उचलत असतात. नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी कमी पडत असल्यामुळे काही ठेकेदारदेखील स्वच्छता करण्यासाठी नेमलेले आहेत. त्यांच्याकडील कर्मचारीदेखील समुद्रकिनारा असो, श्रीवर्धन शहरातील रस्ते असो, या परिसरातील स्वच्छता उत्तम प्रकारे करत असतात.

उचललेल्या कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाटदेखील लावण्यात येते. श्रीवर्धन नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मितीदेखील करण्यात येते. श्रीवर्धन शहरातील गटारे त्याचप्रमाणे नाले नियमितसाफ करण्यात येतात व त्यामध्ये कीटकनाशकेदेखील फवारण्यात येतात. श्रीवर्धन शहरात व्हर्टिकल गार्डन, शोभनीय कारंजे, जनजागृती करण्यासाठी बनवण्यात आलेली भित्ती चित्रे, तसेच प्लास्टिक बंदी, महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे कापडी पिशव्या बनवून वाटपाचे कामदेखील चांगल्या रीतीने सुरू आहे. देशातील पश्चिम विभागांमध्ये श्रीवर्धन नगरपरिषदेने 20 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर नगरपरिषदेने स्वच्छता अत्यंत चोख ठेवली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावरील सुशोभीकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, त्याचप्रमाणे सफाई कामगार, ठेकेदारी तत्त्वावरील सफाई कामगार या सगळ्यांचीच कामगिरी कौतुकास्पद आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2024 साठी आपल्या नगरपरिषदेचा देशात प्रथम क्रमांक येईल, यासाठी सर्वांनी कामाला लागू या! तसेच श्रीवर्धन शहरातील स्वच्छताप्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगार या यशाचे खरे हिरो आहेत.

विराज लबडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, श्रीवर्धन नगरपरिषद
Exit mobile version