। श्रीवर्धन । वार्ताहर ।
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये श्रीवर्धन नगरपरिषदेने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या नगरपरिषदेला केंद्रस्तरीय पश्चिम विभागातून 15 हजार ते 25 हजार लोकवस्ती असलेल्या नगरपरिषदांमध्ये 44 वा नंबर आलेला आहे. तर राज्यभरातील 295 नगरपालिकांमधून नगरपरिषदेचा सोळावा क्रमांक आलेला आहे. या अगोदरच्या सर्वेक्षणात नगरपालिकेला ओडीएफ प्लस असा दर्जा मिळाला होता. परंतु आता स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नगरपरिषदेला ओडीएफ डबल प्लस असा दर्जा प्राप्त झाला आहे.
शहरामध्ये एकूण चार घंटागाड्या सकाळ व संध्याकाळ कचरा उचलण्यासाठी सातत्याने फिरतात. तर कंत्राटी पद्धतीने घेतलेले कामगार देखील दिवसभर गटारे साफ करणे, गटाराच्या कुंपणावरती वाढलेली झाडे साफ करणे व सर्व कचरा घेऊन डम्पिंग ग्राउंडमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकण्याची कामे नियमित करीत असतात. रस्त्यावर गाडीखाली कुत्रा, मांजर, घूस, उंदिर यांसारखे प्राणी मेल्यानंतर नगर परिषदेकडे तक्रार केल्यानंतर त्यावर देखील तातडीने कारवाई करून मृत जनावरे तातडीने उचलून त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येते. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या यशाबद्दल मुख्याधिकारी व प्रशासक विराज लबडे यांनी शहरातील नागरिकांचे आभार मानले आहेत.