रायगडात स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान

| महाड | प्रतिनिधी |

संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन सतगुरु माता सुदीक्षा यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील नद्यांसह शहरातील विविध तलाव, विहिरी अशा एकूण 22 ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.

रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली, सावरोली, मार्केवाडी, तिवरे, पेण, बोर्वे, रोहा, कोंडगाव, अलिबाग, पोयनाड, सारळ, भिलजी, खरसई, भरडखोल, श्रीवर्धन, वडवली, खरवली, कडापे, चोरवली, महाड, बिरवाडी तसेच रावतळी या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी येथील सावित्री आणि काळ नदी संगमच्या परिसरात तसेच केतकीचा कोंड (भवानी नगर) वाळण बु. येथील विहीरीसह परिसरामध्ये आणि पारदुलेवाडी येथे तलावाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य व प्रेरणादायी आयोजन सतगुरु माता सुदीक्षा व निरंकारी राजपिता रमित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील 25 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 930 शहरांमधील 1 हजार 600 हून अधिक ठिकाणी यशस्वीपणे पार पडले. या अभियानात सुमारे 12 लाख स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला अशी माहिती संत निरंकारी मंडळाचे खरसईचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी दिली.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिवांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. देशभर प्रसारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आयोजनाची सुसूत्र आणि संस्कारित कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली.

Exit mobile version