| नागोठणे | महेश पवार |
पनवेलवरुन कोलाडकडे निघालेल्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात बसमधील क्लिनर सुनील नारायण गायकवाड (वय 26, रा. उंब्रज बोरीखुर्द, ता. कंधार, जि. नांदेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील रामनगर समोरील मुंबई-गोवा महामार्गावर 12 डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला होता. रामनगर येथील अपूर्ण स्थितीत असलेले गतिरोधकच याआपघातास जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
या अपघातासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचा चालक अजय अदावडे (वय 33, रा.मु.पो तिरूका, ता. जळकोट जि.लातुर) हा त्याच्या ताब्यातील बस मुंबई-गोवा महामार्गावरून पनवेलकडुन कोलाडकडे अतिवेगाने जात असताना अपघात घडला.
नागोठण्यातील रामनगर येथे बस आली असता बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने पुढे जाणाऱ्या डंपरला पाठीमागुन जोरदार ठोकर दिली. त्यामुळे बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बसमध्ये क्लिनर सीटवर बसलेला सुनील गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता.
क्लिनरच्या मरणास तसेच बसच्या नुकसानीस कारणीभुत ठरलेला बसचालक अजय अदावडे याच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गणेश भोईर हे करीत आहेत.