प्लास्टिकमुक्तीसाठी कनकेश्‍वर डोंगरावर स्वच्छता मोहीम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र व संडे कनकेश्‍वर ट्रेक टीमकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने कनकेश्‍वर डोंगरावर जाऊन स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती मोहीम राबविण्यात आली. माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्व पर्यटकांना डोंगर दुर्ग परिसरात कचरा करू नका, प्लास्टिक इतरत्र फेकू नका, असे आवाहन केले. प्रत्येक पर्यटकाने किल्ले डोंगरावर पर्यटनासाठी नक्की जावे; परंतु आपल्यामुळे निसर्गाला काही त्रास होऊ नये याचा विचार केला पाहिजे. 300 ते 400 वर्ष प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि जर जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेले तर त्यांना हानिकारक आहे. तसेच प्रत्येक पर्यटकाने जमल्यास सोबत हँडग्लोज व कचरा पिशवी ठेवावी व शक्य असल्यास परिसरात पडलेला कचरा गोळा करून कचराकुंडी किंवा पुनर्वापराकरिता द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कनकेश्‍वर पायथ्यापासून ठिकठिकाणी अंतरावर लायन्स क्लब मांडवाकडून कायमस्वरुपात कचराकुंडी आहेत, त्यामध्ये बराच कचरा व प्लास्टिक जमा करण्यात आला. या मोहिमेत माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, संडे कनकेश्‍वर ट्रेक प्रमुख उमेश वाळंज, आरसीएफ अधिकारी तुषार कोलते, आनंदी स्कुलच्या शिक्षिका धनश्री, माणुसकी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अश्‍विनी हुलवान, अर्चित कोलते, सिद्धेश रानवडे व इतर माणुसकी टीम उपस्थित होती.

Exit mobile version