| नविन पनवेल । वार्ताहर।
गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. खारघर-तळोजा परिसरात हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे प्रभागातील असलेल्या 36 तलावांच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे.
पनवेल पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालया अंतर्गत खारघर-तळोजा वसाहत, तसेच रोहिंजण, तळोजा मजकूर, पापडीचा पाडा, पेठाली, भोईर पाडा, घोटकॅम्प, घोट, तुरमाळे, करवले, तळोजा, खुटारी, पेंधर आदी गावे आणि काही आदिवासी पाड्यांचा समावेश होतो. खारघर आणि तळोजा परिसरात जवळपास नव्वद सार्वजनिक, तर दहा हजारांहून अधिक घरगुती गणेशांची स्थापना केली जाते. या मूर्तींचे विसर्जन खारघर परिसरातील तलावांमध्ये करण्यात येते. पण या तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात विविध वनस्पती उगवल्या आहेत. तसेच तलाव, विसर्जन घाटांकडे जाणार्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पालिकेने विसर्जनावेळी गणेशभक्तांची गैरसोय टळावी म्हणून आतापासून एका एजन्सीची नेमणूक करून तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.
पालिकेकडून मंडप, विद्युत व्यवस्था
खारघर आणि तळोजा वसाहत सिडकोकडे असल्यामुळे दरवर्षी सिडकोकडून सर्व कामे केली जात होती. मात्र यंदा विसर्जन घाटाकडे जाणारे सर्व रस्त्यांची आणि तलावांची स्वच्छता, मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था, स्पीकर तसेच गणेश घाटावर निर्माल्य कलश आणि विसर्जनासाठी स्वयंसेवकदेखील पालिकेकडून नेमण्यात येणार आहेत.
कृत्रिम तलाव
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्यामुळे पालिका प्रशासनाने या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी खारघर, कामोठे, तसेच खारघर प्रभाग कार्यालयांत समावेश असलेल्या रोहिंजण गावात कृत्रिम तलाव उभारले आहेत.
गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यात खारघर प्रभाग कार्यालय हा मोठा नोड असल्यामुळे तलाव साफसफाईचे काम सुरू आहे. तसेच रस्ते आणि गणेश विसर्जनाची सर्व तयारी पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
संजय कटेकर,
उपशहर अभियंता, पनवेल महापालिका.