गडावरील दोन टाके केले साफ
| सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातून जवळ असणारा आडवाटेवरचा व दुर्लक्षित गड म्हणजे अनघाई, अनगड कमी घेर असलेल्या या गडावर, कळंब ग्रामस्थ मंडळ, सहयाद्री ट्रेकर्स, श्री धर्मवीर प्रतिष्ठान व स्वयंपूर्ण सुधागडच्या दुर्गसेवकांनी नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी गडावरील दोन पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या. यामुळे गडावर येणारे ट्रेकर्स व दुर्गप्रेमींच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे.
या गडावर पोहोचणे हेच ट्रेकर्सची मानसिक व शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारे आहे. अशा कठीण परिस्थितीत टिकाव, फावडे, घमेले सारखे जड साहित्य घेवून ही मंडळी सकाळी सहा वाजताच किल्ल्यावर पोहोचली. गडावर असलेल्या ङ्गअनगाईफ मातेची पूजा करून गड संवर्धनाचा नारळ फोडण्यात आला. सध्या गडावर चार दृश्य पाण्याची टाकी असून गाळ, मातीने भरलेल्या दोन टाक्यांची साफसफाई करण्यात आली. हे मेहनतीचे काम सकाळी साडेसहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अविरत करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कळंब ग्रामस्थ मंडळाचे नरेश खानेकर, अक्षय जाधव, किरण जाधव, रोहित खानेकर, सहयाद्री ट्रेकर्सचे गणेश खानेकर, रोहित सावंत, शाम तांबे, श्री धर्मवीर प्रतिष्ठानचे राज इंदवटकर, अतुल कदम, मानसी शिरगावकर, स्वयंपूर्ण सुधागडचे संस्थापक दत्तात्रय दळवी, शुभम दळवी व इतर सहका-यांनी विशेष मेहनत घेतली.
गाळ, मातीमुळे गडावरील पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच पाण्याच्या टाक्या या गाळाने भरलेल्या असल्याने त्यात पाणीही साठत नाही. येथे येणारे ग्रामस्थ, ट्रेकर्स यांना पाण्याची गरज आहे. पाण्याच्या टाक्या साफ झाल्यानंतर त्यात पिण्यायोग्य पाण्याचा साठा होईल व येथे येणार्या प्रत्येकाला हे पाणी पिता येईल. – गणेश खानेकर, सहयाद्री ट्रेकस
