भरपावसात मृगगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम फत्ते

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील भेलीव गावाजवळील छोटेखानी पण मोक्याच्या ठिकाणी असलेला इतिहासातील महत्त्वपूर्ण असा मृगगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर नुकतीच मुसळधार पावसात दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दुर्गवीरमार्फत गेली आठ वर्षे मृगगडावर सातत्याने संवर्धन व श्रमदान मोहीम राबण्यात येत आहेत. या वेळच्या मोहिमेत गडावरील पाण्याचे मुख्य बांधीव टाक्यातील दगड व माती चैनपुलीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांचे वर्गीकरण करुन सुव्यवस्थित ठेवण्यात आले आहेत. उर्वरित टाके पुढील मोहिमेत मोकळे केले जाईल. हे टाक पूर्णतः दगड, माती व गाळ यातून मोकळे झाले तर यामध्ये पिण्याचे पाणी टिकून राहील व मृगगडावरील उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्‍न सुटेल असा अंदाज दुर्गवीरांचा आहे.

या मोहिमेत मुंबई, नवी मुंबई, कल्याण व भिवंडी येथील एकूण 22 दुर्गवीरांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये एकनाथ अस्वले, मंगेश पडवळे, भूषण पाटील, रुपाली अवघडे, विशाल इंगळे, अमित शिंदे, प्रतिक पाटेकर, मंदार गावकर, नयन पोटे, प्रतीक इंदुलकर, अजित करके, सौरभ भागल, रोशन कदम, करण गुळवी, किशोर सावरकर, चेतन रावल, मनोज तरडे, ओम जगताप, प्रतीक भोनकार, रुपेश दळवी, श्रीहरी पवार, सीमा पाटील, योगेश पाटील यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण किल्ला
सुधागड तालुक्यामधील हा अपरिचित गड आहे. याच्या पूर्वेस मुख्य सह्याद्री रांगा, मोराडीचा सुळका, लोणावळा लायन्स पॉईंट, उजवीकडे दुरुन दिसणारा कोरीगड व पश्‍चिमेला अंबा नदी आणि दूरवर सुधागड व पालीतील सरसगड आहे.

या गडावर अजूनही काही वास्तु श्‍वास घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या कार्यात स्थानिक व तरुण हातांची गरज आहे. या सर्वांचे सहकार्य लाभले तर नक्कीच या गडाला नवसंजीवनी देण्याचे कार्य आमच्या हातून घडेल हा विश्‍वास आहे.

एकनाथ अस्वले, सदस्य, दुर्गवीर प्रतिष्ठान
Exit mobile version