खारघर टेकड्यांवर स्वच्छता मोहीम

| खारघर | प्रतिनिधी |

खारघर टेकड्या परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबवत के.जे. सोमय्या स्कूल ऑफ इंजिनीरिंग येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम स्टुडंट्स कौन्सिलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला नाही, तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही जाणून घेतली.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी खारघर टेकड्यांवरील प्लास्टिक, कागद, बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. ‌‘टेकड्या वाचवा, निसर्ग जपा’ आणि ‌‘प्लास्टिकमुक्त परिसर’ या संकल्पनांना बळ देत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. वाढत्या शहरीकरणामुळे टेकड्यांवर होणारे प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम लक्षात घेता, अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांनी समूहाने काम करत टेकड्यांवरील विविध भाग स्वच्छ केले. काही विद्यार्थ्यांनी कचरा संकलनाचे काम केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना बळकट झाली. या उपक्रमासाठी खारघर हिल्स वेलफेअर असोसिएशन, निसर्ग फ्रेंडशिप सोसायटी तसेच सजग नागरिक मंचच्या सदस्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version