। माथेरान । वार्ताहर ।
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान संपूर्ण राज्यभर घेण्यात येत असून माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने माथेरान शहरात स्वच्छता सेवा पंधरवडा राबविण्यात आला. माथेरान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धा आणि माथेरान शहर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मी यांची आरोग्य तपासणी तसेच माथेरान शहरातील अनेक भागात स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
सेवा पंधरवडाअंतर्गत माथेरान शहरात स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात आला. माथेरानमध्ये स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहीमे अंतर्गत माथेरान नगरपरिषदेच्यावतीने येथील स्वच्छता विषयक कर्मचारी आणि सफाई मित्रांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील बैरामजी जिजीभाई रुग्णालयात करण्यात आले होते.
माथेरान शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार्या येथील स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी शिबिरात करण्यात आली. आरोग्य शिबीर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली मिसाळ यांनी यशस्वी रित्या पार पाडले. या आरोग्य शिबिरास डॉ.नितीन सिंग (अस्थिरोग तज्ञ), डॉ.वर्षा सिन्हा सिंग (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.पठाण शबीर खान (स्त्रीरोग तज्ञ) यांची उपस्थिती होती. तसेच या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित रॉय आणि ऋषिकेश केंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर माथेरान नगरपरिषदे वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेत नगरपरिषदेमार्फत स्वच्छता ही सेवा अभियान आणि स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता विषयी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी पण यामध्ये मोठा सहभाग नोंदवला होता. चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून येथे विद्यार्थ्यांनी स्वच्छता संदेश दिला. सदरील स्पर्धा ही यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांनी मेहनत घेतली. माथेरान शहरातील पिसारनाथ मार्केट, रिगल नाका ते एको पॉईंट परिसर भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, अन्सार महापुळे आणि ज्ञानेश्वर सदगीर तसेच सर्व सफाई कामगार, घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण अभियान आणि स्वच्छता सेवा पंधरवडा उत्तमरीत्या, उत्साहात व आनंदात साजरा केल्याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सर्वांना धन्यवाद देत आभार मानले.