आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द
। रायगड । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड थळतर्फे रायगड जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांना औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी 20 लाख रुपयांचे अर्थसहाय्य निर्गमित सामाजिक दायित्वच्या माध्यमातून देण्यात आले आहे. आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांना धनादेश सुपूर्द केला. यावेळी आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांसह महाव्यवस्थापक संजीव हरळीकर, प्रभारी मुख्य व्यवस्थापक महेश पाटील व जनसंपर्क अधिकारी संतोष वझे उपस्थित होते.
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिमाह सुमारे 600 डायलेसिस सेशन्स होत असतात. ज्यात जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर डायलिसिस उपचार केले जातात. या रुग्णांकरिता कंझ्युमेबल्स, सोल्युशन्स व औषधे खरेदीसाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबतचे विनंती पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांद्वारा आरसीएफला दिले होते. या महत्वपूर्ण औषधांची रुग्णांसाठीची आवश्यकता लक्षात घेऊन आरसीएफ व्यवस्थापनाने संचालक मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 लाख रुपयांचे अर्थसहाय्य सीएसआर अंतर्गत तात्काळ मंजूर करून घेतले. गरजूंना लाभदायी ठरतील अशा योजनांसह रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल अशा योजना प्राधान्यक्रमाने राबविण्यावर आरसीएफचा नेहमीच भर राहिला आहे. सीएसआरच्या माध्यमातून समाज उन्नयनासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे.