निसर्गातील अद्भुत किमया; पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागात पक्ष्यांची घरटी
| माणगाव | प्रतिनिधी |
वळवाच्या पावसाची चाहूल लागताच ग्रामीण भागातील निसर्ग पुन्हा एकदा जिवंत झाला असून, सुगरण पक्ष्यांनी आपल्या घरट्यांच्या बांधणीसाठी लगबग सुरू केली आहे. ओढे, नाले, विहिरी तसेच तळ्याकाठच्या झाडांवर पाण्याच्या दिशेने लोंबकळणारी सुगरण पक्ष्यांची कलात्मक घरटी सध्या नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी ही घरटी म्हणजे पावसाच्या आगमनाची जणू नैसर्गिक सूचना ठरत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्याच्या प्रारंभीच सुगरण पक्ष्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नर सुगरण पक्षी अत्यंत मेहनतीने गवताच्या काड्या, पेंढा, धागे आणि बारीक तंतू गोळा करून हवेत लटकणारी सुंदर घरटी तयार करतात. घरट्यांची रचना इतकी मजबूत आणि आकर्षक असते की ती पाहून प्रत्येकजण अचंबित होतो. या घरट्यांमध्ये सुरक्षित प्रवेशद्वार, अंडी ठेवण्याची जागा आणि पिल्लांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र भाग तयार करण्यात येतो. सुगरण पक्ष्यांची ही घरटी प्रामुख्याने काटेरी झाडांवर किंवा पाण्याच्या परिसरातील झाडांच्या फांद्यांवर बांधली जातात. यामागे पिल्लांचे संरक्षण हा मुख्य उद्देश असतो.
पावसाळ्यात वाऱ्याचा वेग, पावसाचा मारा आणि इतर पक्ष्यांपासून धोका टाळण्यासाठी सुगरण पक्षी अतिशय नियोजनपूर्वक जागेची निवड करतात. त्यामुळे त्यांच्या या कौशल्यपूर्ण बांधकामाचे ग्रामस्थांकडून नेहमीच कौतुक केले जाते. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी सांगतात की, सुगरण पक्ष्यांची हालचाल वाढू लागली की पावसाचे आगमन जवळ आले आहे, अशी खात्री वाटू लागते. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग येतो. निसर्ग आणि पक्ष्यांमधील हे अनोखे नाते ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाते. सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची रचना ही वास्तुकलेचा अप्रतिम नमुना मानली जाते. साधारण दीड ते दोन फूट लांबीची ही घरटी खाली निमुळती होत जातात. प्रवेशद्वार अरुंद आणि सुरक्षित असल्यामुळे पिल्लांना धोका कमी असतो. गवताच्या विणकामातून तयार होणारी ही घरटी निसर्गातील कौशल्य, संयम आणि मेहनतीचे प्रतीक मानली जातात. पक्षी निरीक्षकांच्या मते, बदलत्या पर्यावरणामुळे अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असले तरी सुगरण पक्ष्यांची ही घरटी आजही निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देतात. झाडांची होणारी तोड, पाणवठ्यांचे कमी होणारे प्रमाण आणि वाढते प्रदूषण यामुळे पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पक्षी संवर्धनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
निसर्गप्रेमींना आनंद
पावसाळ्याच्या आगमनापूर्वी सुगरण पक्ष्यांची सुरू झालेली ही लगबग ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. निसर्गप्रेमींना आनंद देणारी ठरत आहे. निसर्गातील या सुंदर कलाकृती पाहण्यासाठी अनेकजण ओढे, तलाव आणि शेत परिसरात गर्दी करताना दिसत आहेत.
