युद्धाचे ढग

आपल्यापासून कैक हजार किलोमीटर लांब असलेल्या रशिया आणि त्याचा शेजारीलदेश युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता असून कोणत्याही क्षणी संघर्ष पेटू शकेल असे वातावरण निर्माण झालेले आहे. आपल्या अर्थव्यवस्था जगाशी जोडल्या गेलेल्या असल्याने जगभरात कोणालाही सर्दी झाली तर आपल्यालाही शिंका येतातच. त्यामुळे गेल्या आठवडाहून अधिक काळात भारतातील शेअरबाजार याच शिंकांमुळे काही हजार अंशांनी खाली गेला आहे आणि गुंतवणूकदार हे युद्ध खरोखरीच पेटले तर काय करायचे या चिंतेने ग्रासले आहेत. रशियाला या युद्धाबाबत विचारले तर तो ठामपणाने आपली युक्रेनवर हल्ला करण्याची कोणतीही योजना नाही असे म्हणत असून ही अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांनी पसरवलेली अफवा असल्याचे सांगत अशा निखालस खोट्या आणि धोकादायक प्रकाराचा निषेधही करत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पाश्‍चिमात्य देशांना भिती पसरवू नका असे आवाहन केले आहे तर फ्रान्सचा असा दावा आहे की पुतिन यांचे मुख्य उद्दिष्ट युद्ध करणे हे नसून त्याच्या दबावाखाली स्वत:च्या देशासाठी एक चांगला सुरक्षा करार मिळवणे आहे. मात्र या मतांवर कोणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. त्याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे रशियाने केवळ आठ वर्षांपूर्वी 2014 साली युक्रेनवर आक्रमण करून तेथील मोठा भूभाग ताब्यात घेतला होता. त्यावर त्याने आपला ऐतिहासिक हक्क असल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच, सुमारे एक लाखांचे रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेजवळ तैनात केले गेले असून जवळपास तीस हजारांहून अधिक सैनिक शेजारच्या बेलारूस देशामध्ये सरावात गुंतलेले आहे. त्यामुळे संभाव्य धोक्याची गंभीर दखल जगभर घेतली जात आहे. नाटो संघटनेतर्फे जारी करण्यात आलेल्या चेतावणीनुसार सदर संघर्षाचा धोका खूप वास्तविक आहे. अमेरिकेचे म्हणणे असे की आता कोणत्याही दिवशी रशियाचे आक्रमण होऊ शकते. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मात्र त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे भारतासह अनेक पाश्‍चात्य देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले असून काही देशांनी युरोपीयन सुरक्षा संस्थांच्या निरीक्षकांनाही माघारी येण्यास सांगितले आहे. मुळात रशिया युक्रेनला का युद्धाची धमकी देत आहे, हे पाहायला हवे. युक्रेनच्या सीमा ज्या प्रकारे युरोपीयन समुदाय समूह देशांशी जोडलेल्या आहेत, तशाच त्या रशियाशीही जोडलेल्या आहेत. म्हणजे या दोन्ही देशांच्या सीमा त्याला आहेत. युक्रेनला युरोपीयन समुदायात जायचे आहे. म्हणजे पर्यायाने नाटो संघटनेत सामील व्हायचे आहे. त्याला रशियाचा विरोध आहे. कारण एक तर युक्रेन हे भूतपूर्व काळातील सोव्हिएत प्रजासत्ताकचा भाग होते. म्हणून त्याचे रशियाशी सखोल सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. म्हणूनच तेथे रशियन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. पाश्‍चात्य राष्ट्रांनी युक्रेनच्या मागे आपली शक्ती लावली आहे. अमेरिका आणि इंग्लंडने तर त्यांना शस्त्रे पुरवली आहेत. युद्ध झाले तर मॉस्कोला आर्थिक शिक्षा करण्याच्या उद्देशाने काही निर्बंधांवरही चर्चा झालेली आहे. पुतिन यांनी युक्रेनमध्ये आपले सैन्य उतरविल्यास, अमेरिका आणि युरोपियन मित्रराष्ट्रांनी रशियाला यापूर्वी कधीही न बसलेला आर्थिक फटका देण्याचे ठरवले आहे. मुख्यत्वे त्याला जगभरातील एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे फिरवण्याच्या प्रणालीतून बाहेर काढले तर त्याच्या अर्थव्यवस्थेचे तात्काळ आणि दीर्घकालीन नुकसान होईल, यात शंका नाही. युक्रेनबद्दल रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या वैचारिक डावपेचाला गेल्या वर्षी सुरुवात केली होती. त्यांनी रशियन आणि युक्रेनियन लोकांना एक राष्ट्र म्हटले आणि त्यांनी युक्रेनच्या सध्याच्या सत्तारूढ नेत्यांना रशियासह विरोधी उपक्रम राबवित असल्याचे जाहीर वक्तव्य केले. याचे कारण युक्रेनला नाटोकडे जाण्यापासून रोखणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. कारण तसे झाले तर नाटो नियंत्रित करत असलेल्या सागरी आणि भूप्रदेशात रशियाला रोखले जाण्याची भिती आहे. ती भिती रास्तच आहे. म्हणून रशियाने नाटो आणि युरोपीयन समुदाय या दोन्ही युरोपीय संस्थांकडे झुकणार्‍या युक्रेनला रशियाने आधीपासून प्रतिकार केला आहे. त्यामुळे युक्रेन नाटो या 30 देशांच्या संरक्षणात्मक युतीमध्ये सामील होणार नाही याची हमी देण्याची त्याची पाश्‍चिमात्य देशांकडे केलेली मागणी मुख्य आहे. युद्ध टाळण्यासाठी वाटाघाटी झालेल्या आहेत, होत आहेत. परंतु त्या मूक आणि बहिर्‍या माणसांतील संवाद आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सगळेच युद्धाच्या ढगाच्या सावलीखाली आहेत.  

Exit mobile version