सहकारी संस्थांनी कामकाजामध्ये व्यावसायिकता आणणे आवश्यक

सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे प्रतिपादन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र ही देशाच्या सहकार चळवळीची राजधानी तसेच महाराष्ट्र हे देशाच्या सहकारी चळवळीचे उगमस्थान आहे. पण केवळ याच गोष्टीचा अभिमान बाळगण्याचे दिवस संपले असून स्पर्धात्मक युगात सहकार क्षेत्राने आणि विशेषता सहकारी बँकांनी आपल्या कामकाजामध्ये व्यावसायिकता आणणे अत्यावश्यक असून रायगड जिल्हा सहकारी बँकेने ज्याप्रमाणे सहकारी क्षेत्रामध्ये अधिक गतीमानता यावी याकरिता धाडसी निर्णय घेवून त्याची अमलबजावणी केली त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी कोकण विभागाच्या नागरी सहकारी बँकांसाठी अलिबाग येथे रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर चर्चासत्रामध्ये केले.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, कोकण विभागाचे सहनिबंधक आप्पाराव घोळकर, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, चीफ मॅनेजर भारत नांदगावकर हे उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारातून समृद्धीकडे हे धोरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे अतिशय कुशलतेने राबविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी देशात सहकारी संस्था सक्षमीकरणावर आणि त्या संगणकीकृत भर दिला आहे. पण रायगड जिल्हा सहकारी बँकेने या विविध कार्यकारी सस्थांचे एकत्रीकरण आणि त्यानंतर त्यांचे संगणकीकरण पूर्ण केलेले असून काळाच्या वेगापेक्षा अधिक गतिमान व्यवस्था उभारण्यामध्ये बँकेचे योगदान मोठे असून सहकार क्षेत्रातील बँकांनी त्याबाबत रायगड सहकारी बँकेचा आदर्श घेवून काम करणे अधिक महत्वाचे ठरते असेही मत राज्याचे सहकार आयुक्त कवडे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी यावेळी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पर्यटनाकरिता आकर्षक संधी असून जिल्हा बँकेने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे, त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रामधील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल याकरिता बँकेने आपले योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे यांनी देखील मार्गदर्शन करताना बँकेचे कामकाज सुधारण्यासाठी कृती आराखडा आणि त्यानंतर बँकेने करावयाची आमंलबजावणी याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बँकिंग तज्ञ गणेश निमकर यांनी देखील भविष्यातील सहकारी बँकांना संधी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. या चर्चासत्राकरिता कोकण विभागातील 14 नागरी सहकारी बँकेच्या चेअरमन, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपला नोंदविला .

Exit mobile version