खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?

शेकडो वीजखांब जमीनदोस्त; ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील खारेपाट परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजखांब आणि वीजतारा कोसळल्या. मात्र, या नुकसानीला केवळ नैसर्गिक आपत्ती जबाबदार नसून, गेल्या दोन-अडीच वर्षांत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा हा परिणाम असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वादळाचा फटका संपूर्ण तालुक्याला बसला, तरी खारेपाट परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीजखांब कोसळल्याने महावितरणच्या कामांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदारांनी अंदाजपत्रकानुसार काम न करता निकृष्ट साहित्याचा वापर केला, तसेच वीजखांब उभारण्यासाठी आवश्यक खोलीचे खड्डे न खोदताच कामे उरकली गेली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्यासमोर हे खांब अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे खारेपाटातील अनेक गावांचा वीजपुरवठा गेल्या दोन-तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेती, उद्योग, व्यवसाय आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक तरुणांनीही निःस्वार्थपणे खांब उभारणे, साहित्य वाहून नेणे आणि दुर्गम भागात मदत करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. जीवाची पर्वा न करता हे तरुण राबत असताना त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मात्र, याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आज स्थानिक युवक प्रत्यक्ष श्रम करून मदत करत असताना, उद्या याच कामांची बिले ठेकेदार किंवा संबंधित यंत्रणांनी स्वतःच्या नावाने काढली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version