नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त

| पनवेल | वार्ताहर |

खारघर सेक्टर34 मध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकाला मध्यरात्री खारघर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अटक केली. इग्ब्लूम मायकल ओकेचुकी (50) असे त्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याकडील पाच लाख 70 हजार रुपये किंमतीचे 57 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले. हे अंमली पदार्थ त्याने कुठून आणले याचा तपास सुरू आहे.

खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि शेजवळ, सपोनि दत्तात्रय पवार त्यांच्या पथकाने खारघर भागात गस्त घातल्यानंतर पापडीचा पाडा सेक्टर-34 भागात नाकाबंदीला सुरुवात केली. रात्रीच्या सुमारास ओकेचुकी हा नायजेरियन व्यक्ती स्कुटीवरून संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. नाकाबंदीवरील पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 57 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत पाच लाख 70 हजार रुपये आहे. ओकेचुकी याच्याकडे पोलिसांनी अंमली पदार्थाबाबत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेले कोकेन जप्त करून त्याला एनडीपीएस कायद्याखाली अटक केली.

Exit mobile version