। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुका पातळीवर सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषक कल्याणकारी संस्था (चौल) आणि नारळ विकास मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ काढणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम फेब्रुवारी-मार्च 2025 या कालावधीत घेतला जाणार आहे. सहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणार्यास नारळ काढणीची शिडी मोफत देण्यात येणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यात नारळी-पोफळीच्या असंख्य बागा आहेत. परंतु, दिवसेंदिवस नारळ काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने बागायतदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. मजुरांअभावी नारळ काढणी, झाडांची साफसफाई वेळेवर होत नाही. त्याचा परिणाम उत्पादनवाढीवर होत आहे. त्यातच जे नारळ काढणीसाठी मजूर आहेत, त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, तरुणवर्ग या व्यवसायाकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे या व्यवसायात मजुरांची वानवा जाणवत आहे.
बागायतदारांची ही मोठी समस्या कृषक कल्याणकारी संस्थेने जाणून घेऊन जवळपास आतापर्यंत 58 तरुण सुशिक्षितांना संस्थेच्या माध्यमातून नारळ काढणीचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे. त्यामध्ये 20 मुलींचाही समावेश आहे. त्यामुळे या तरुणांचा रोजगाराचाही प्रश्न मिटला आहे. या प्रशिक्षणार्थीना साडेचार हजार रुपये किमतीची नारळावर चढण्याची शिडी मोफत तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. येत्या फेब्रुवारी-मार्च 2025 ला पुन्हा एकदा या नारळ काढणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार्यांना नारळाच्या झाडावर चढण्याच्या शास्त्रवत प्रशिक्षणाबरोबर या तरुणांचा रोजगाराचाही प्रश्न मिटला आहे. शास्त्रवत प्रशिक्षणाबरोबर नारळ पिकावर विविध रोग, कीड व्यवस्थापन, खत विविध व प्रथमोपचार आदी शिकवले जाणार आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण करणार्या मोफत शिडी देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम सहा दिवसांचा असून, चौल येथे प्रशिक्षण केंद्र असणार आहे. प्रशिक्षण घेणार्याचे वय 18 ते 45 यादरम्यान असावे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. जर कोणी महिला प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असल्यास, त्यांनाही प्रशिक्षणात सहभागी होता येईल, अशी माहिती कृषक कल्याणकारी संस्था चौलचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. ज्या व्यक्तींना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी रवींद्र गजानन पाटील 8975932044, प्रमोद पाटील 9158520215 यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
रवींद्र गजानन पाटील, पाटीलवाडा, चौलमळा-पाझर, पो. चौल, ता. अलिबाग, जि. रायगड 402203 या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
जास्तीत तरुणांना प्रशिक्षित करुन त्यांना स्वयंरोजगाराचे एक साधन निर्माण करण्याबरोबरच बागायदारांना भासत असलेली नारळ काढणी मजुरांची (पाडेकर्यांची) समस्या दूर करण्याचा कृषक कल्याणकारी संस्था चौलचा उद्देश आहे.
रवींद्र पाटील,
संस्थापक-अध्यक्ष, कृषक कल्याणकारी संस्था