। माणगाव । वार्ताहर ।
वैचारिक जडणघडणीतून आपला पक्ष तयार झाला असून, आपली बांधिलकी ही जनतेशी असून, प्रतिगामी शक्तींच्या विरोधात म्हणजेच भाजपच्या विरोधात आपली लढाई असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मोर्बा येथे बोलताना व्यक्त केले.
माणगाव तालुका शेकापचा संवाद कार्यकर्ता मेळावा मोर्बा येथील शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माणगाव तालुका चिटणीस अस्लम राऊत यांच्या नेतृत्वाखाली एस.एस.हायस्कुल मोर्बा येथे सोमवारी (दि.10) सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला माजी आ.बाळाराम पाटील, राजिपच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, अस्लम राऊत, हसनमिया बंदरकर,भागोजीबुवा डवले, माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड, राज्याच्या महिला आघाडी अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, प्रदीप नाईक, तालुका सहचिटणीस राजेश कासारे, देगाव सरपंच सुषमा वाघमारे, उपसरपंच दिनेश गुगले, अॅड. विलास गोठल, अॅड. मुसद्दीक राऊत, माजी सरपंच सखाराम जाधव, माजी उपसरपंच अमोल मोहिते, नामदेव शिंदे, चंद्रकांत सत्वे, स्वप्नील दसवते, निजाम फोफळूणकर, नितीन वाघमारे, इनायत टाके, आजीम बंदरकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील पुढे म्हणाले कि, गेली 3 दिवस पक्षांच्या सभा वेगवेगळ्या तालुक्यात होत असून, सर्वत्र सभांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. विधानसभा निवडणुकीत आपण मागे पडलो पण येणार्या काळात आपल्याला नव्याने पक्षाची बांधणी करायची आहे. ज्यांना पक्षाने मोठे केले ते पक्ष सोडून गेले. आता पक्षात येणार्या लोकांनी पक्षासाठी पहिले काम करावे. त्यांचे काम पाहून पक्ष वाढीच्या दृष्टीने जबाबदार्या देण्यात येतील. देशाची लोकशाही जिवंत ठेवायला हवी. यासाठी आपल्याला लढाई करायची आहे. हा जिल्हा पुरोगामी विचाराचा आहे. आपल्याला प्रतिगामी शक्तीच्या विरोधात लढाई करायची आहे. माणगावला संवाद मेळाव्याला अपेक्षेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लाभला. हे पाहून आनंद वाटतो आहे. जिल्हा परिषद शेकाप शिवाय होऊ शकणार नाही, असे सांगत संवाद मेळावा संपल्यानंतर आपल्याला पोलादपूरला जिल्हा मेळावा घ्यायचा असून, त्याठिकाणी आपण सर्वंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन त्यांनी केले.
माजी आ.बाळाराम पाटील म्हणाले कि, जिल्ह्याचा दौरा आपले नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करीत असताना शेकापची ताकद जिल्ह्यात किती आहे. याचे दर्शन आपण सर्वानी घडविले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार मतदार संघातून आपल्याला साडे चार लाख मते पडली. जिल्ह्यात आजही पक्षाची साडे सहा लाखांहून अधिक मते आहेत.
जिल्ह्यात एकट्या पक्षाचा विचार केला तर, सर्व पक्षाच्या तुलनेत शेकापचीच ताकद जास्त आहे. येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपल्याला पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे. जिल्ह्यात तसेच तालुक्यातील वातावरण पाहता कोणी कितीही वल्गना केल्या तरी कधी संपणार नाही. गोरगरीब शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेचा आपला पक्ष आहे. शेकापचा कार्यकर्ता हा अडीअडचणींना धावून जातो हीच शेकाप पक्षाची ओळख आहे. सत्येत बसलेली मंडळी विविध कामात व्यस्त आहेत. सरकार हे जनतेसाठी असले पाहिजे. सरकारी योजना जनतेसाठी असल्या पाहिजेत.
आताचे सरकार शेतकरी व गावाचा विचार करीत नाही. बिल्डरांच्या घशात गवे घालण्याचा या सरकारचा अंतरीम उद्दिष्ट आहे. नव्याने आलेले प्रकल्प जनतेसाठी नसून उद्योगपतींसाठी राबविण्याचा धोरण अवलंबविले जाते. याकडे आताचे खासदार, आमदार, मंत्री दुर्लक्ष करीत आहेत. विकासाला आमचा विरोध नाही परंतु तो विकास जनतेसाठी असला पाहिजे असे बाळाराम पाटील यांनी सांगत येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वानी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन तालुका सहचिटणीस राजेश कासारे यांनी केले.