संजय राऊत यांनी सरकारला फटकारले
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. गंगास्नानसाठी गर्दी झाल्याने प्रयागराजमध्ये येणार्या बॉर्डर पोलिसांनी सील केल्या. त्यामुळे रस्त्यांवर वाहांनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक तासांपासून भाविक अन्न पाण्याशिवाय रस्त्यावर ताटकळत राहिले. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला व उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला फटकारले आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाकुंभाच्या ठिकाणी विमान कंपन्या, पाणीवाले, हॉटेलवाले, गाडीवाले सर्वच भाविकांना लुटत आहेत. 15-15 तास भाविक रस्त्यावर आहेत. त्याला मी रोड अरेस्ट म्हणतो. सरकारने हात वर केले आहेत. तुम्ही जगभरातील हिंदूंना कुंभमध्ये सामिल व्हायचे आमंत्रण दिले आहे. आपण यजमान आहात व यजमानांनी पाहुण्यांना वार्यावर सोडले आहे. तसेच, कुंभ हा राजकीय सोहळा झाला आहे, कुंभच पावित्र भाजपने नष्ट केले. काल देशाच्या राष्ट्रपती महाकुंभला गेल्या त्यावेळी 12 तास लोकांना वेठीस धरले. राष्ट्रपतींच्या स्नानासाठी लोकांना बारा तास तिथे येऊ दिले नाही. बोटी येऊ दिल्या नाही. त्रिवेणी संगमावर सगळं बंद केले होतं. आंघोळीला काय बारा तास लागतात. हे जे व्हिआयपी कल्चर कुंभमध्ये आले आहे त्याचा किती फटका सामान्य भाविकांना बसला आहे. राष्ट्रपतींसाठी अख्ख प्रयागराज बंद केले, घाट बंद केले, बोटी बंद केल्या. हा काय कुंभमेळा आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.