डॉ. सुहास मानेंनीच दिली निष्क्रियतेची कबुली


डॉ. प्रमोद गवई यांचा पलटवार; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आरोपानंतर वैद्यकिय कर्मचार्‍यांमध्ये असंतोष
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढत रुग्णांचा वाढलेला मृत्यूदर हा डॉ. प्रमोद गवई तसेच डॉ. सुचिता गवळी यांच्या तसेच इतर कर्मचार्‍यांच्या खोट्या रजांच्या दरम्यान झाल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकिय कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी तर आपल्या अनुपस्थितीत जिल्हा रुग्णालयातील मृत्यूचा दर वाढला हे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे विधान म्हणजेच मी केलेले कामकाज हे किती महत्वाचे होते व माझ्या आजारपणामुळे असलेल्या अनुपस्थितीत ते कामकाज करुन घेऊ शकत नसून ते स्वतःच्या पदाचा कार्यभार सांभाळण्यास अक्षम असल्याची अप्रत्यक्षरित्या स्वतःच दिलेली कबुली असल्याचा पलटवार डॉ. गवई यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी डॉ. सुहास माने यांच्या कारभाराचे चांगलेच धिंडवडे काढले. याबाबत त्यांनी सांगितले कि, सध्याच्या कोव्हिड संसर्गाच्या काळात आपापसात विचारविनियम करुन रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज करणे आवश्यक असतांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने यांची भूमिका सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सामोपचाराची नसते. उलट ते प्रत्येक वेळेस नकारात्मक भूमिका घेऊन सहयोगी अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करतात. तसेच अशा प्रकारची विधाने करुन नाहक मानसिक त्रास व दडपण देतात. माझ्या अनुपस्थितीत जिल्हा रुग्णालयातील मृत्यूचा दर वाढला, हे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे विधान म्हणजेच मी केलेले कामकाज हे किती महत्वाचे होते व माझ्या अनुपस्थितीत ते कामकाज करण्यास निष्क्रिया ठरले असल्याची स्वतःच दिलेली कबुली आहे, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल.

शुक्रवारी कृषीवलच्या माध्यमातून डॉ. माने यांनी केलेले विधान न पटण्यासारखे आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून ते आजतागायत अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यपरायणतेने कामकाज केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याच्या कालावधीत कोव्हिड संसर्गाची पहिली लाट सुरु झाली होती. त्यामुळे रुग्णांमध्ये मोठया प्रमाणावर भितीचे वातावरण होते. अशा कालावधीत वरिष्ठ तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाने दैनंदिन रुग्णालयीन कामकाज उत्तमरितीने केले आहे.

जिल्हयात विविध ठिकाणी कोव्हिड उपचार केंद्र स्थापन करणे, रुग्णांची त्वरीत चाचणी होऊन तात्काळ रिपोर्ट मिळावा याकरिता आरटीपीसीआर लॅब स्थापन करणे आदी अनेक कामे वेळेत पूर्ण केली आहेत. कामाची पावती म्हणून प्रत्यक्ष जिल्हाधिकार्‍यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविलेही आहे. डॉ. माने यांनी केलेा आरोप अत्यंत चुकीचा असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रीतसर अर्ज सादर करुन तसेच आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन वैद्यकीय रजा घेतली. तसेच प्रकृती ठीक होताच कर्तव्यावर हजर झालो असल्याचेही डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले.

Exit mobile version