नागरिक त्रस्त, पारा देखील घसरला
| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन शहरासह तालुक्यात मागील दोन दिवसांपासून थंड बोचर्या वार्यांचा कहर सुरू आहे. थंड हवेचे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असून यामुळे पारा देखील घसरल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास थंड वारे वाहण्यास सुरुवात होते. या वार्यांचा वेग देखील काही प्रमाणात जास्त आहे. हे थंड वारे शरीराला बोचत असल्यामुळे त्याला ‘बोचरा वारा’ असे देखील संबोधले जाते. मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.
रात्रीच्या वेळेस व पहाटे खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडते. त्याचप्रमाणे दव देखील खूप पडलेले पाहायला मिळते. त्यामुळे दुचाकीच्या सीट तसेच उभ्या केलेल्या गाड्या पाऊस पडून गेल्या प्रमाणे ओल्या झालेल्या दिसतात. सुटणार्या थंड व बोचर्या वार्यामुळे नागरिकांना सर्दी, पडसे, खोकला इत्यादी त्रास देखील बळवल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस व सकाळी शेकोट्या पेटवून नागरिक शेकण्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळी तापमान 16 ते 17 अंश सेल्सिअस इतके खाली येत असल्याने नागरिक अक्षरशः कुडकुडत आहेत. कडाक्याच्या पडणार्या थंडीमुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. बोचरे वारे व जास्त पडणार्या थंडीमुळे नागरिकांनी स्वेटर, कान टोपी, मफलर तसेच उबदार कपडे वापरण्यासाठी काढलेले पाहायला मिळत आहेत. एकूणच बोचरे वारे व थंडी यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.