रायगडचे ध्वजारोहण करणार जिल्हाधिकारी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे सरकारने अद्याप पालकमंत्री नेमले नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला जिल्ह्याचा शासकीय मुख्य ध्वजारोहणाचा मान रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री असल्याने इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असल्याने त्यानुसार हा मान जिल्हाधिकार्‍यांना मिळणार आहे.

बहुतांश नेत्यांना आपापले जिल्हे दिले आहेत. आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच पालकमंत्री त्या जिल्ह्याचे राहतील का, याची उत्सुकता आहे. मात्र रायगडचे पालकमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पालकमंत्री नेमताना दोन्ही पक्षांना (भाजप आणि शिंदे गट) सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे यासाठी दोन्ही पक्ष ताकद लावत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचा शासकीय मुख्य ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळतो याकडे लक्ष लागले होते. शासनातर्फे आज याबाबतची यादी प्रसिद्ध करीत कोण कुठे ध्वजारोहण करणार हे स्पष्ट करण्यात आले आहे.

रायगडसह कोल्हापूर, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. तर देेवेंद्र फडणवीस- नागपूर, सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर, चंद्रकांत पाटील-पुणे, राधाकृष्ण विखे पाटील– अहमदनगर, गिरीश महाजन– नाशिक, दादा भुसे – धुळे, गुलाबराव पाटील– जळगाव, रवींद्र चव्हाण-ठाणे, मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर, दीपक केसरकर-सिंधुदुर्ग, उदय सामंत-रत्नागिरी, अतुल सावे-परभणी, संदिपान भुमरे-औरंगाबाद, सुरेश खाडे-सांगली, विजयकुमार गावित-नंदुरबार, तानाजी सावंत-उस्मानाबाद, शंभूराज देसाई -सातारा, अब्दुल सत्तार-जालना, संजय राठोड-यवतमाळ, अमरावती येथे विभागीय आयुक्त.

Exit mobile version