महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तासांना दांडी

समुद्रकिनाऱ्यावर अश्लील चाळे; श्रीवर्धन येथे धक्कादायक प्रकार

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेतील काही तासांना दांडी मारून इयत्ता अकरावी तसेच बारावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या टेंटखाली अश्लील चाळे करताना आढळत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे हाती भ्रमणध्वनी घेत आणि दुसरीकडे अश्लील चाळे करणे, असे प्रकार या ठिकाणी उघडपणे सुरू असतात. या वयात अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून एखादा अनुचित प्रकार घडण्याची किंवा अत्याचाराची दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपले पाल्य महाविद्यालयात सुरक्षितपणे शिक्षण घेत आहे, या अपेक्षेत पालक असतात; मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. या गंभीर बाबीची माहिती प्रत्यक्षदर्शींनी महाविद्यालयाच्या अध्यक्षांना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्राचार्यांनी प्राध्यापकांना सूचना देऊन प्रत्येक तासाला विद्यार्थ्यांची हजेरी घेणे अनिवार्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दामिनी पथकाची गस्त ठेवावी
सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 या महाविद्यालयीन वेळेत श्रीवर्धन पोलीस ठाण्याने समुद्रकिनाऱ्यावर दामिनी पथकाची नियमित गस्त ठेवावी, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Exit mobile version