रायगडात रंगीबेरंगी फुलांचा रंगोत्सव

पर्यटकांची रंगांची उधळण पाहण्यासाठी गर्दी

| पाली /बेणसे | वार्ताहर |

सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विपुल वनसंपदा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील डोंगर रांगा, रस्त्याच्या कडेला, माळरान व जंगल आदी ठिकाणी ज्वाला फुले म्हणजेच पळस, बहावा, कुडा, पांगरा, पिवळा गुलमोहर/सोनमोहोर, उक्षी, कांचन व कटेसावर आदी झाडांना बहर आला आहे. जणूकाही फुलांचा रंगोत्सव येथे सुरू झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह निसर्ग अभ्यासक देखील सुखावले आहेत. पर्यटक देखील ही रंगांची उधळण पाहण्यासाठी आवर्जून येथे थांबतात. आणि डोळे भरून विविधरंगी फुलांचा आनंद घेतांना दिसत आहेत.

निसर्गाचा हा चमत्कार पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे. विशेषतः पर्यटकांना ही फुले आकर्षित करतात. फुलांनी बहरलेले ही झाडे अनेक पशु पक्षांना खाद्य व आश्रय देतात. त्यामुळे येथे विविध पक्षांचा किलबिलाट असतो. जैवविविधता देखील बहरते. या ऋतूतील विविध आकर्षक फुले निसर्ग व पक्षी अभ्यासकांना ही पर्वणी आहे. हा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील याठिकाणी निरीक्षणासाठी आवर्जून येत असतात.

फ्लेम ऑफ द फायर पळस
फ्लेम ऑफ द फायर म्हणून ज्याचे वर्णन केले जाते त्या पळसाची लाल व भगवी फुले खूप बहरली आहेत. डोंगराळ भाग, रस्त्याच्या कडेला आणि शेताच्या बांधावरील पळसाच्या झाडावर आलेली ही भडक लाल भगव्या रंगाची फुले जंगलाला आग लागल्या प्रमाणे भासत आहेत. त्यामुळे यांना ज्वालाफुले असे देखील म्हणतात. एका ब्रिटिश अधिकार्‍याने या फुलांच्या लालभडक रंगावरून पळसाच्या फुलांना फ्लेम ऑफ द फायर हे नाव दिले आहे.
भरगच्च बहरलेले गिरीपुष्प
गिरीपुष्प याला ग्लिरिसिडिया असे नाव आहे. हा पानझडी वृक्ष असल्यामुळे पाने गळून गेल्यानंतर फांद्यांच्या टोकांवर निळी जांभळी फुले गुच्छात येतात. फुलांनी बहरलेले गिरीपुष्प झाड फार सुंदर दिसते. या झाडाची फुले शोभेसाठी वापरली जातात. या झाडांच्या बिया उंदरांनी खाल्यास उंदीर मरतात. या झाडांच्या हिरव्या पानांपासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.
मनमोहक देवचाफा
देव चाफ्याची फुले पांढरी असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी रंगाचे असते व खोडाला पारंब्या असतात. ही फुले किंवा या फुलांचा हार देवाला वाहतात. म्हणून सहसा हे झाड देवळाबाहेर लावलेले दिसते. रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा दिसतात.
सोन मोहोराच्या फुलांचा गालिचा
याला पिवळा गुलमोहर किंवा ताम्रशिंपी असे देखील म्हणतात. नाजूक पिवळ्या जर्द पिवळ्या कागदासारख्या पाकळ्यांच्या फुलांमुळे सर्व झाड पिवळेधमक दिसते. झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सजावट होते. रस्त्यावर पडलेली ही पिवळी फुले जणू काही रस्त्यावर पिवळा गर्द गालीच्या अंथरला आहे याप्रमाणे वाटते. येथून जाणारे वाटसरू व पादचारी यांना ही फुले मनस्वी आनंद देतात.
पिवळा धम्मक बहावा
पिवळा धम्मक आकर्षक गोल्डन शॉवर म्हणजेच बहावा बहरला आहे. ही लोंबकळणारी पिवळी धम्मक फुले सर्वांचे लक्ष वेधत आहेत. सध्या जिल्ह्यात जंगल, माळरानावर व रस्त्याच्या कडेला बहाव्याची फुलांनी बहरलेली झाडे दिसत आहेत. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष म म म्हणून ओळखला जातो.
बहावा पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. फुलांनी बहरल्यावर साधारण 45 दिवसांच्या आत पाऊस सुरू होतो. एक उपयोगी व सुंदर वृक्ष म्हणून बहाव्याला ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्टुला मराठी नाव बहावा व कर्णिकार हे आहे. तर संस्कृत नाव आरग्वध आहे. इंग्रजी नाव आणि हिंदी नाव अमलतास आहे.
लालबुंद मखमली पांगारा
पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगार्‍याला फुले येतात. याच्या फुलांना गंध नसतो, मात्र फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणार्‍या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे वेधून घेतात.
उक्शी गर्द फुले
झुडपावर उगवलेली उक्शीची गर्द फुले औषधी असतात. ही फुले फिकट व पिवळट हिरवी असून फांद्यांच्या शेंड्यावर परिमंजरीत मार्च-मेमध्ये येतात. रस्त्याच्या कडेला माळरानावर ही झुडपे उगवतात त्यावर प्रचंड दाटीने उक्शी फुले बहरतात.
चविष्ट सुवासिक कुडाची फुले
पांढरा कुडा किंवा मइंद्रजवफ किंवा मकुटजफ मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधांमध्ये कु्ड्याचा वापर होतो. 10 ते 15 फूट उंच वाढणार्‍या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढर्‍या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजी सुद्धा करतात.
कांचनची आकर्षक फुले
फुले गुलाबी, पांढरी, फिकट जांभळ्या रंगावर गडद जांभळ्या छटा असलेली आणि सुवासिक असतात. यातील चार पाकळ्या फिकट कोनफळी रंगाच्या व पाचवी पाकळी गडद रंगाची असते. काही फुलांच्या एक किंवा दोन पाकळ्यांच्या मुळाशी पिवळ्या रंगाचे ठिपके सुद्धा आढळतात. ही फुले फारच आकर्षक व मनमोहक दिसतात. कांचन या वृक्षाच्या फुलांचा हंगाम हा डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिल मध्ये असतो.
आकर्षक व पशुपक्ष्यांचे अन्नदाते काटेसावरचे फुल
काटेसावरीची फुले मोठी, पाच पाकळ्या, पाकळ्या जाड आणि रंग गडद गुलाबी, खूप सारे पुंकेसर असलेली असतात. या फुलांना खाण्यासाठी खारुताई झाडावर बागडते. तर फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळी या झाडावर जमा होते.
Exit mobile version