| रसायनी | वार्ताहर |
औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कंपनीचे व्यवस्थापन सतर्क आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी डीरेक्टरेट इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ विभाग व एनडीआरएफच्या संयुक्त विद्यमाने रंगीत तालीम दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या आवारात घेण्यात आली.
कंपनीमध्ये अमोनिया वायू गळती झाल्याची सूचना दुपारी 12. 5 वाजता संबंधित प्रशासनाला देण्यात आली. वायुगळती आटोक्यात येणार नाही, असे लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांना गोळा होण्याच्या ठिकाणी घेऊन यावे, अशी सूचना सरकारी यंत्रणांना देण्यात आली. आजूबाजूच्या गावातील सरपंचांना याबद्दल माहिती देण्यात आली. यादरम्यान काही कामगारांवर वायुगळतीचा परिणाम होवून बेशुध्द अवस्थेत पडल्याचे दाखवण्यात आले. यावेळी सरकारी यंत्रणा व आजूबाजूच्या कंपन्यांमधून लागणारे सहकार्य व गोष्टींची उपलब्धता करण्यात आली. हा सगळा घटनाक्रम व्यवस्थितरीत्या हाताळण्यात आला. यादरम्यान बचावकार्यात काही त्रुटी आढळल्या, तर त्यावर आमचे व्यवस्थापन काम करेल, अशी ग्वाही कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
या रंगीत तालीमसाठी जवळपास एक तास लागला. याप्रसंगी डिशचे सहसंचालक विक्रम काटमवार, केशव केंद्रे, डॉ. भालेराव, तळोजा एमआयडीसी उपअभियंता अविनाश गदाडे, प्रवीणकुमार, दीपक फर्टिलायझर्सचे दिनेश प्रतापसिंह, सुब्रमण्यम नेती, प्रदीप तांडेल, अविनाश ननावरे, प्रकाश सावंत, अनिल कदम, जयश्री काटकर, अरुण शिर्के आदी उपस्थित होते.
वायुगळतीची रंगीत तालीम
