धूलिवंदनानिमित्त बाजारपेठा सजल्या; बच्चे कंपनीची वाढली गर्दी
| उरण | प्रतिनिधी |
संपूर्ण महाराष्ट्रात होळी व रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यासह रायगड जिल्ह्यात होळीनंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो. यानिमित्त एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण केली जाते. त्यासाठी लागणारे पर्यावरणपूरक रंग तसेच वेगवेगळ्या आकाराच्या व रंगांच्या पिचकाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात दाखल झाल्या आहेत. उरण तालुक्यातील बाजारपेठेमध्येही पिचकाऱ्या व रंग मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यंदा मात्र रंगासह पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एका वस्तूमागे किमान 5 रुपये अधिक मोजण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे.
धुलिवंदननिमित्त रंगांची उधळण करण्याचा खेळ ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी साजरा केला जातो. ही परंपरा आजही जपली जाते. यावर्षी यंदा सोमवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी होळी आहे. होळी उभारून पारंपरिक व धार्मिक पद्धतीने विधीवत पूजन केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.3) धुलिवंदन आहे. या दिवशी सकाळपासून सर्वच ठिकाणी रंगांची उधळण केली जाणार आहे. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून धुलिवंदनाचा आनंद लुटला जाणार आहे. धुलिवंदन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धुलिवंदन साजरा करण्यासाठी लागणारे रंग, वेगवेगळ्या रंगांच्या व आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. साध्या पिचकाऱ्यांसह बंदूकवाल्या आणि टँकरवाल्या पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. तसेच, मुलांच्या आवडीचे छोटा भीम, बेनटेन, बॉबी डॉलची कार्टून असलेली पिचकारीदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या पिचकाऱ्यांची किंमत 10 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी किमती स्थिर आहेत. तर, काही ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीमध्ये 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने या वस्तूंचे दर काही प्रमाणात बाढविण्यात आले आहे. महागाईची झळ असतानाही त्यावर मात करीत धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी खरेदीला पसंती दिली आहे.
उरण तालुक्यात बाजारात पिचकाऱ्या खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 50 टक्के खरेदी झाली आहे. धुलिवंदनाच्या दोन दिवस अगोदर ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याचे उरणमधील विक्रेत्यांनी वर्तविले आहे.
शेकडो वर्षांची परंपरा अबाधित
उरणमध्ये काही ठिकाणी होळीच्या दहा दिवस अगोदर लहान होळी पेटविण्याची परंपरा आहे. उरण शहरातील देऊळवाडी येथे शीतळादेवी मंदिरासमोर दरवर्षी होळीच्या दहा दिवस अगोदर छोटी होळी पेटविली जाते. अंदाजे 100 वर्षांहून जास्त वर्षांची ही परंपरा आजच्या 21 व्या युगातही तरुण मोठ्या आनंदाने व उत्साहाने जपली आहे.
