प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचा उपक्रम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या वतीने ज्येष्ठ रंगभूषाकार रमेश झोरे, लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते राजन पांचाळ, लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते किशोर म्हात्रे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या वतीने 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या समारंभासाठी अध्यक्षस्थानी नाट्यलेखक-दिग्दर्शक विश्वास तांबोळी, साहित्यिक उमाजी केळुसकर, मंचाचे सचिव, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, नाट्यअभिनेते जगदीश नागे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, श्रीरंग घरत, नंदू तळकर, अॅड. राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगभूषाकार रमेश झोरे, लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते राजन पांचाळ, लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते किशोर म्हात्रे यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी साहित्यिक उमाजी केळुसकर, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात नाट्यलेखक-दिग्दर्शक विश्वास तांबोळी यांनी नाटक निव्वळ मनोरंजनाचे साधन नसून आपल्या भोवतालचा, स्वत:च्या मनाचा शोध असल्याचे सांगितले.
आपल्या सत्काराला लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते राजन पांचाळ यांनी उत्तर दिले. तर लेखक, दिग्दर्शक, नाट्यअभिनेते किशोर म्हात्रे, नाट्यअभिनेते जगदीश नागे यांनी याप्रसंगी आपल्या नाट्याभिनयाची झलक उपस्थितांना दाखवली. सचिव नागेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभारप्रदर्शन नंदू तळकर यांनी केले.