अधिकारी वर्गाकडून विकासकामांची पाहणी
| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असणारी व सरपंच अनिल ढवळे यांच्या नेतृत्वात कार्य करनार्या ग्रुप ग्रामपंचायत शिवकरने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. या स्पर्धेच्या पुढील भागातील कोंकण विभागीय स्पर्धेकरिता 26 मार्च रोजी परीक्षण पार पडले. या परीक्षणात आलेले परिक्षणार्थी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, पालघर जि. प उपअभियंता, रायगड जि.प चे स्वच्छता अधिकारी जयवंत गायकवाड, रवि गायकवाड, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे व अविनाश घरत यांचे गावाच्या वेशिवर स्वागत करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांचे स्वागत केले. या वेळी सरपंच अनिल ढवळे, उपसरपंच लक्ष्मण तुपे, सदस्य सुरज भगत, सदस्य विष्णू पाटील, सदस्या ज्योती पाटील, मिनाक्षी ढवळे, मंजुळा घरत, दर्शना पाटील, आदिती तुपे, आरती पाटील, हर्षल पाटील तसेच गावातील 25 महिला गटातील 200 महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी आयोजित सभेत आरती पाटील यांनी गावाची विस्तृत माहिती दिली तसेच सरपंच अनिल ढवळे यांनी प्रस्तावना केली. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते यांनी उपस्थित महिलांना संबोधित करत ग्रापंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, महिला मंडळ व ग्रामस्थांचे गावाच्या विकासात हातभार लावल्याबद्दल अभिनंदन केले. शिवकर ग्रामपंचायत स्वच्छता स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत 5 लाखांचे बक्षीस मिळविलेले आहे. तसेच कोकण विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्यास 10 लाख व राज्यात प्रथम आल्यास 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहेत.
स्पर्धेचे निकष असल्याप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व शौचालयाचे परीक्षण करण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीचा सांडपाणी व्यवस्थापन शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. संपूर्ण ग्रामपंचायतीचा सांडपाणी एकीकडे जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुव्यवस्थित सांडपाणी प्रकल्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. घनकचर्यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प देखील सुव्यवस्थित असून निर्माण होणारा खत शेतकर्यांना वाटप केला जात आहे. शिवकर ग्रामपंचायतीचा व्यवस्थापन प्रकल्प पाहता स्वच्छता स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम येण्याची आशा पल्लवित होत आहे.