सोमजादेवी मंदिराच्या बांधकामास सुरूवात

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धनमधील श्री सोमजादेवी मंदिर तीर्थक्षेत्र विकसित करण्याच्या कामाला जोमाने सुरुवात झाली असून सर्वप्रथम योजनेच्या आराखड्यात उल्लेखित भक्तनिवासाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

या मंजूर योजनेच्या कामकाजासंबंधी श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे व स्थापत्य अभियंता विनायक चौगुले चांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वा सहा कोटी रुपयांचा निधीची गरज असून, त्यापैकी शासनाकडून 4 कोटी 18 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर उर्वरित खर्च श्रीवर्धन नगरपालिका आणि श्री सोमजाई देवस्थान प्रत्येकी 1 कोटी 3 लाख खर्च करणार आहे. नियोजनानुसार सर्व तीर्थक्षेत्र विकास पूर्ण करुन नगर परिषदेने ते देवस्थान ट्रस्टकडे हस्तांतरित करावयाचे आहे. सर्व कामकाज योजनेप्रमाणे पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे इतकी आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या दुरुस्तीमध्ये कळसाचे काम करण्यात येणार असून त्यापुढील मंडप तसाच राहून श्री हनुमान मंदिराच्या कळसाचे काम करण्यात येणार आहे. तसेच सध्याची जी होळीची जागा आहे त्या अंगणात पूर्वेच्या बाजूला भक्त निवासाचे काम सुरु करण्यात आले असून भक्त निवासाची तळमजला अधिक दोन मजले असलेली इमारत व कंपाऊंड वॉल प्रस्तावित आहे. तसेच कंपाऊंड वॉल व प्रवेशद्वार कमान प्रस्तावित आहे. भक्तनिवासामध्ये स्वच्छता गृह, जिना, डॉर्मिटरी, सभागृह, भक्तांसाठी पहिल्या दोन मजल्यांवर परिपूर्ण खोल्या, पहिल्या मजल्यावर ट्रस्टचे कार्यालय इ.व्यवस्था होणार आहेत. यासाठी खा.सुनील तटकरे यानी विशेष प्रयत्न केलेले आहेत.

Exit mobile version