। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील सुकेळी धनगरवाडा येथिल नागरीकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. परंतु या रस्त्याच्या कामासाठी येणार्या विविध अडचणी यांना सामोरे जात तसेच कोणत्याही निधीची वाट न पाहता या रस्त्याच्या कामासाठी येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र कोकले व जगन कोकले या दोघांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याच्या कामाला सर्व धनगरवाडा ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून सुरुवात केली. यावेळी धनगरवाडा ग्रामस्थांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद पहावयास मिळाला.
ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधील काही आदिवासी वाड्या या अद्यापही अनेक समस्यांच्या विळख्यात आहेत. मग तो प्रश्न रस्त्याचा असो वा पिण्याच्या पाण्याचा. या समस्यांचा आम जनतेला सामना करावा लागत आहे. येथील सुकेळी धनगरवाडा रस्त्याचा प्रश्न देखिल अनेक वर्षांपासून काही कारणांमुळे वंचित होता. तसेच पावसाळ्यात तर या धनगरवाड्यातील ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला झोली करुन घेऊन गेल्याशिवाय काहीच पर्याय नसतो. या सर्व गोष्टींची दखल घेत सुकेळी धनगर वाड्यातील युवा कार्यकर्ते राजेंद्र कोकले व जगन कोकले या दोघांनी कोणत्याही निधीची वाट न पाहता या रस्त्याच्या तात्पुरता का होईना परंतु रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. तसेच भविष्यात ज्यावेळी निधी उपलब्ध होईल त्या वेळी चांगल्या पद्धतीचा रस्ता बनविणार असल्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी राजेंद्र कोकले व जगन कोकले यांचे मनापासून आभार मानले आहेत.