दुकानदारांच्या खात्यात कमिशन जमा

शासनाकडून रायगडसाठी दहा कोटींचे वितरण
| माणगाव | प्रतिनिधी |
गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्यासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्विंटल 150 रुपयांचे कमिशन देण्याचे शासनाने जाहीर केले होते. सदर धान्याचे वाटप केल्यानंतरसुद्धा दुकानदार कमिशनच्या प्रतीक्षेत होते. याबाबत रेशन दुकानदारांनी 31 मार्चपासून रेशनवरील धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर या आंदोलनाची दखल घेत शासनाने जिल्ह्यातील थकलेल्या वितरण कमिशनची दहा कोटी रुपयांची रक्कम आली असून, दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्याचा करण्यात येत आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील धान्य वितरणचे कमिशन शासनाकडून जिल्ह्याला आले आहे. तर, जानेवारी ते मार्च चालू धरून तीन महिन्यांचे कमिशन मिळणे बाकी आहे. माणगाव तालुक्याला 1 कोटी 1 लाख रुपये आले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित सर्व रेशन दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांतून आनंदाचे वातावरण पसरले आहे. शासनाकडे महाराष्ट्रातील 127 कोटी 51,88,982 रुपये, तर रायगड जिल्ह्यातील दुकानदारांचे कमिशन 9 कोटी रुपये थकले होते. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. यासाठी रायगडातील रेशन दुकानदारांनी 31 मार्चपासून रेशनवरील धान्यवाटप बंद करण्याचा इशारा दिला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 28 फेब्रुवारी रोजी स्वस्त भाव धान्य रेशनदुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी लेखी निवेदन दिले होते.

1 जानेवारी 2023 पासून शासनाने मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व रेशनदुकानदार मोफत धान्य वाटप करीत आहेत. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे कमिशन शासन संबंधित दुकानदारांना अदा करणार होते. मात्र, मार्च महिना संपला तरीही दोन महिन्यांचे कमिशन शासनाकडून दुकानदारांना अदा केले नाही. रेशन दुकानदारांना त्या दुकानाचे लाईट बिल, दुकानभाडे तसेच दुकानात असणार्‍या कामगारांचा खर्च पडत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार आर्थिक संकटात पुरता सापडला होता. जून ते डिसेंबर या सात महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री गरीब योजनेतून रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदूळ वितरीत करण्यात आले होते.

Exit mobile version