कामाच्या त्रुटी, असुविधांबाबत काढले वाभाडे
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी सोमवारी (दि.28) दुपारी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन करत वेगवेगळ्या विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्याकडून रुग्णालयातील अस्वच्छता, ऑनलाईन कामांच्या त्रुटी, रुग्णांना योग्य सेवा न देणे अशा अनेक असुविधांबाबत वाभाडे काढून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
एनएचएम विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या ठिकाणी भेट दिली. सुरुवातील त्यांनी अलिबाग तालुक्यातील धोकवडे, झिराड, आवास, किहीम येथील आरोग्य व उपकेंद्राला भेट दिली. त्यानंतर उसर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली. संथ गतीने सुरु असलेल्या कामांचा आढावा घेऊन लवकराच लवकर कामे करण्यात यावी, अशी सुचना दिली. जिल्हा रुग्णालयात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय असूनदेखील कामांमध्ये सुधारणा नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ऑनलाईन कामकाज देखील पाहिले. मात्र, या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच, रुग्णालयातील कचरा साठवून ठेवण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्टॉक बुक सेंटरसह वेगवेगळ्या विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधला. दरम्यान, काही रुग्णांनी समाधान तर काही रुग्णांनी रुग्ण सेवेच्या समस्या मांडल्या. यावेळी रुग्णालयातील कारभाराबाबत समाधान व्यक्त करीत असताना त्रुटींची पुर्तता करण्याबरोबरच सुविधा तात्काळ देण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांना आदेश दिले. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी रुग्णालयातील केलेल्या स्टींग ऑपरेशनने रुग्ण प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणून गेले.
