जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील नागरिकांना गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री रायगड ना. श्री. उदय सामंत यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे सोमवारी (दि.1) महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगश म्हसे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, अलिबाग प्रांत प्रशांत ढगे, सा.बां. कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली. सामंत यांनी उघड्या जीपमधून संचलनात सहभागी पथकांचे निरीक्षण केल्यानंतर पोलीस दल, होमगार्ड पथकांनी दिमाखदार संचलन केले. या पथकांचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी केले, तर त्यांना संचलन उपप्रमुख म्हणून पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी उत्तम साथ दिली.

पोलीस विभागास 11 नवी वाहने
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून रायगड पोलीस विभागास 11 नवी वाहने सुपूर्द करण्यात आली.

Exit mobile version